मुख्य संपादक विनायक पाटील
चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास अपायकारक विमल गुटखा, सुगंधित तंबाखू व विविध प्रकारचा पान मसाला जप्त केला. या प्रकरणी संबंधित दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोऱ्हाडे व चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शहरातील काही दुकानांची तपासणी केली. यावेळी भाजी मंडई परिसरातील रॉयल फ्रुट दुकानासमोरील सार्वजनिक जागेत फिरोज हुसेन बागवान (रा. दर्गाअली, आझाद चौक, चोपडा) हा विमल पान मसाला, करमचंद पान मसाला, तानसेन पान मसाला तसेच व्ही-1 सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित व आरोग्यास घातक पदार्थांची अवैधरित्या विक्री करताना आढळून आला.
तसेच विरवाडा येथील प्रवीण प्रल्हाद पाटील हा आपल्या मालकीच्या भोलेनाथ पान सेंटरमध्ये अवैधरीत्या विमल गुटखा विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही ठिकाणांहून संबंधित माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा आयुक्तांच्या 16 जुलै 2025 रोजीच्या शासन राजपत्रातील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा कलम 59 लागू करण्यात आले आहे.
याशिवाय भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275 व 223 अन्वयेही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत.
आरोग्यास घातक पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या कारवाईमुळे अवैध गुटखा व तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक : विनायक पाटील






















