मुख्य संपादक विनायक पाटील
चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23 गोवंशीय जनावरे जप्त केली. या कारवाईत जनावरे व वाहने असा एकूण 31 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वसीम कुरेशीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश कैलास बाव (ब.क्र. 2188) यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन पिकअप वाहनांमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे 4 वाजता के.जी.एन. कॉलनीजवळील एम.आय.डी.सी. परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित दोन महिंद्रा पिकअप वाहने तेथून जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेली 23 गोवंशीय जनावरे आढळून आली. अनेक जनावरे जखमी अवस्थेत होती. पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहने आणि जनावरे ताब्यात घेतली.
31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला :
23 गोवंशीय जनावरे – अंदाजे किंमत ₹11 लाख 70 हजार
महिंद्रा पिकअप (क्र. MP 46 G 2741) – किंमत ₹10 लाख
विनाक्रमांक पिकअप वाहन – किंमत ₹10 लाख
एकूण जप्त मुद्देमाल : ₹31 लाख 70 हजार
तीन जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी वसीम कुरेशी (रा. रमीन अली, चोपडा) तसेच दोन्ही पिकअप वाहनांच्या चालकांविरुद्ध गुन्हा रजि. नं. 302/2026 अन्वये चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325, 324(4), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5(अ), 5(ब), 9 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यातील कलम 11(1)(ड), (ढ) व (च) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन जनावरांचा मृत्यू
प्राथमिक तपासात आरोपी हे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. वाहतुकीदरम्यान जनावरांना मारहाण करून अत्यंत अरुंद जागेत कोंबून ठेवल्यामुळे दोन जनावरांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जिवंत असलेली 21 गोवंशीय जनावरे सुरक्षितपणे गौशाळेत जमा करण्यात आली असून त्यांची देखभाल सुरू आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारधी (ब.क्र. 2086) करीत आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी नागरिकांना अवैध गोवंश वाहतूक किंवा कत्तलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य संपादक : विनायक पाटील






















